गुरुवार, ६ ऑगस्ट, २०१५

शाळा म्हणजे काय ?

शाळा म्हणजे काय रे भाऊ
एकदा मला कुणीतरी सांगा
प्रवेश घ्यायला या शाळांमध्ये
का लागतात दूरवर रांगा

नाही मला सुंदर गणवेश
बेल्ट आणि त्याच्यासोबत टाय
मम्मी नाही आणि पप्पाही नाही
सांगा मी त्यांना करू कसा बाय

नीटनेटकी तयारी करुन
मी कधीच गेलो नाही शाळेत
तुमचे बुट पॉलीश करण्या
मात्र येतो मी अगदी वेळेत

शिकून सवरून मोठे व्हावे
ही स्वप्ने मला पडत नाहीत
वाढ होणे थांबवता येत नाही
एवढेच मला आहे माहीत

शाळा तुमच्या सुंदर आहेत
पण आम्हाला त्यात स्थान नाही
समता आहे बोलण्यापुरतीच
पैसा नाही त्याला सन्मान नाही

तुमच्या समृद्ध परंपरांचा
तुम्हाला खासा अभिमान आहे
दूर सारून आम्हाला बोलता
भारत आमचा महान आहे

तुम्ही माझे अस्तित्व नाकारले
तरी स्वतःसाठी मी खास आहे
पोटाचीच भूक सर्वात मोठी
यावरच माझा विश्वास आहे

खूप अपेक्षा नाहीत आमच्या
समजून घ्या आमच्या भावना
व्यवस्थेचे बळी असलो तरी
केवळ एकदा माणूस माना
...........सुनील पवार