मंगळवार, ३० जून, २०१५

सामान्य ज्ञान

माझा भारत



देश : भारत, INDIA
राष्ट्रध्वज : तिरंगा ( केशरी, पांढरा व हिरवा या तीन रंगांचे आडवे पट्टे.पांढ-या रंगाच्या मध्यभागी २४ आरे असलेले अशोकचक्र)
लांबी व रुंदीचे प्रमाण ३:२
राजधानी : नवी दिल्ली
राज्यपद्धती : संघराज्य
राष्ट्रगीत : जन- गण- मन
राष्ट्रीय गीत : वंदे मातरम
झंडा गीत : विजयी विश्व तिरंगा प्यारा
राजमुद्रा : सारनाथ स्तंभावरील चार सिंह असलेली मुद्रा
ध्येय वाक्य : सत्य - मेव - जयते
राष्ट्रभाषा : हिंदी
राष्ट्रीय पक्षी : मोर
राष्ट्रीय प्राणी : वाघ(बंगाली वाघ) १९७२ पर्यंत सिंह होता.
राष्ट्रीय फूल : कमळ
राष्ट्रीय फळ : आंबा
राष्ट्रीय खेळ : हॉकी
राष्ट्रहित : अहिंसा
राष्ट्रलिपी : देवनागरी
स्वातंत्र दिन : १५ ऑगस्ट
प्रजासत्ताक दिन : २६ जानेवारी
भौगो.क्षेत्र : ३२,८७,२६३ चौ.कि.मी.

राष्ट्रगीत व अर्थ

जनगणमन -अधिनायक जय हे
भारत - भाग्यविधाता |
पंजाब, सिंधु, गुजरात मराठा,
द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत - भाग्यविधाता |
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
राष्ट्रगीताचा अर्थ :
लोकांच्या मनावर अधिष्ठीत झालेल्या हे भारत भाग्य विधात्या, तुझा जयजयकार असो. तू जनतेच्या ह्रदयाचा स्वामी आहेस. भारताचा भाग्यविधाता आहेस. पंजाब, सिंधू नदीकाठचा(उगमाजवळचा) प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, ओरिसा,बंगाल या सर्व प्रदेशांना तुझा जयघोष जागृत करतो. विंध्यांद्रि व हिमालय या ठिकाणी तुझे यशोगान ऐकू येते. गंगा यमुना यांच्या प्रवाह संगितात निनादते. उसळणा-या सागराच्या लाटा तुझ्या नावांचा गजर करतात. हे सर्वजण तुझा आशीर्वाद मागतात. तुझी कीर्ती गातात. तू सर्वांचे मंगल करणारा आहेस, तुझा जयजयकार असो.

रविवार, २८ जून, २०१५

जुलै दिनविशेष



१ - महाराष्ट्र कृषी दिन
२ - तामिळनाडूमधील कल्पकम येथे अणुऊर्जा केंद्राची स्थापना (१९८३)
३ - भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ (१८५५)
४ - स्वामी विवेकानंद यांचा स्मृतिदिन (१९०२) 
     कान्होजी आंग्रे पुण्यतिथी
५ - आझाद हिंद सेनेची स्थापना (१९४३)
      जलसंपत्ती दिन
६ - व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्मदिन (१९२७)
७ - भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना (१९१०)
८ - सावरकरांची समुद्रातील ऐतिहासिक उडी (१९१०)
९ - वन्यजीवन संघटनेमार्फत वाघ हा राष्ट्रीय प्राणी घोषित केला.
१० - क्रिकेटवीर सुनिल गावसकर यांचा जन्मदिन (१९५४)
११ - नारायण हरी आपटे यांचा जन्मदिन (१८८९)
       जागतिक लोकसंख्या दिन
१२ - संत सावता माळी यांचा समाधी दिन (१२९५)
१३ - मराठी कवयित्री इंदिरा संत यांचा स्मृतिदिन (२०००)
१४ - गोपाळ गणेश आगरकर जन्मदिन (१८५६)
१५ - बालगंधर्वांचा स्मृतिदिन (१९६७)
१६ - नानासाहेब पेशवे यांचा पराभव होऊन पेशवाईचा पराभव
       (१८५७)
१७ - रामदास बोटीला जलसमाधी (१९४७)
१८ - मुंबई विद्यापीठाची स्थापना (१८५७)
        लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन (१९६९)
१९ - भारतातील चौदा बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.(१९६९)
२० - अमेरिकेचा अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर उतरला. (१९६७)
२१ - क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना इंग्रजांनी अटक केली.(१८७९)
२२ - आपल्या तिरंगी झेंड्याची राष्ट्रध्वज म्हणून स्वीकृती(१९४७)
२३ - चंद्रशेखर आझाद जन्मदिन (१९०६)
        लोकमान्य टिळक यांचा जन्म (१८५६)
२४ - पन्नालाल घोष जन्मदिन (१९१९)
२५ - जगातील पहिल्या टेस्टट्यूब बेबीचा जन्म (१९७८)
२६ - राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन (१८७४)
२७ - इंग्लिश रसायन शास्त्रज्ञ जॉन डाल्टन स्मृतिदिन (१८४४)
२८ - पहिल्या महायुद्धास सुरुवात (१९२४)
२९ - ज्येष्ठ स्वातंत्रसेनानी अरुणा असफ अली यांचा स्मृतिदिन (१९९६)
३० - महाकवी तुलसीदासांचा स्मृतिदिन(१६२३)
३१ - जगन्नाथ शंकरशेठ स्मृतिदिन (१८६५)

गुरुवार, २५ जून, २०१५

शिक्षका तुझी भूमिका

शिक्षका तुझी भूमिका

तुझी भूमिका शिक्षकाची
साधना करीत राहा विद्येची
आता माघार कशाला
कर उन्नती बालकांची ||१||

मुले म्हणजे गुलाबाची फुले
त्यांना हळुवार जपायचं
कधी हसवायचं कधी नाचवायचं
त्यातूनच त्यांना शिकवायचं ||२||

विचारा प्रश्न कृती करून घ्या
योजा उपक्रम वापरा साधनतंत्रं
शिकून मोठं व्हायचंय तुला
सुजाण नागरिक होण्याचा द्या कानमंत्र ||३||

शैक्षणिक बदलासाठी प्रशिक्षण योजले
साधनव्यक्ती, केंद्रप्रमुख सारी यंत्रणा जोडली
खोलीपासून शौचालय दिली शैक्षणिक खेळणी
आता कर एकच अध्यापनासह घे उजळणी
जरी स्वातंत्र्य दिले तुला कर पालन आर टी ई चं ||४||

लावल्या कलमाच्या शृंखला
नको छडी मारू ना शब्दाने दुखवायचं
असतील शंका आल्या तुज समस्या
पालक व्यवस्थापन सदस्यांना भेटायचं
उद्बोधनातून गोड बोलून
आपलं उद्दिष्ट दर्जेदार शिक्षण साधायचं ||५||

चंद्रकांत दत्तू कांबळे
पदवीधर शिक्षक
रा.जि.प.शाळा उमरठ ता.पोलादपूर

मंगळवार, २३ जून, २०१५

                         घटती पटसंख्या कारणे व उपाय

                  आज जि.प.शिक्षकांच्या व ज्यांचं ख-या अर्थाने जि.प. शाळेवर प्रेम आहे या सर्वांसाठी काळजीचा विषय म्हणजे मराठी शाळांची घटती पटसंख्या हे आहे. याबाबत कारणांचा व उपायांचा या लेखात आपण विचार करू या.
                  गांधीजींनी सांगितले होते की, खेड्यांकडे चला.पूर्वी खेडी स्वयंपूर्ण होती परंतु स्वातंत्र्य प्राप्तीनंतर परिस्थिती बदलली.शहराकडे रोजगारासाठी शहरात जाणा-यांचे प्रमाण वाढले.त्यामुळे शहरातील शाळा वाढत्या पटामुळे भराभरा वाढू लागल्या तर ग्रामीण भागात याउलट पट कमी होऊ लागला.आजही आपला प्रमुख व्यवसाय शेती आहे.त्याला पूरक असे व्यवसाय गावातच निर्माण झाले तर स्थलांतराचा प्रश्न सुटेल. मराठी शाळांच्या पटाशी या मुद्याची सांगड घालणे हास्यास्पद वाटेल.पण कोकणातील आजची परिस्थिती पाहिली तर कोणालाही हे पटेल.
                  दुसरा मुद्दा पूर्व प्राथमिक शिक्षण जि.प.शाळांना जोडून नसल्याचा. आज पालकांना असे वाटते की माझा मुलगा अभ्यासात अव्वल असावा, नृत्यात निपुण असावा,कराटे खेळता यावे ,सारेगमप मध्ये तो चमकावा. मग अडीच ते तीन वर्षापासूनच मुलाला खासगी शाळेत प्रवेश दिला जातो. जि.प.शाळेत येणारा मुलगा अंगणवाडीत गेलेला असेलच अशी खात्री देता येत नाही शिवाय  अंगणवाडी ताईंनाही अहवाल व इतर कामे यातून वेळ मिळेलच असं आपण म्हणू शकत नाही .
                 खासगी शाळेत प्रवेश घेणारे बहुतांश सुशिक्षित वर्गातील असतात त्यामुळे पाल्याच्या प्रगतीबाबत ते दक्ष असतात.भरमसाठ डोनेशन घेतले जाते व नंतर गुणवत्ता दाखवली जाते.अर्थात गुणवत्ता म्हणजे काय असंही विचारले जाऊ शकते पण तो आपल्या लेखाचा विषय नाही.जि.प. शिक्षक मात्र गोरगरिबांची मुले शिकवत असतो आणि त्याबद्दल त्याची तक्रारही नसते कारण तो देखील त्याच स्थितीतून आलेला असतो. यातूनही जेव्हा मुले गुणवत्ता यादीत झळकतात तेव्हा ही या विषम व्यवस्थेला लगावलेली चपराक असते.
               खासगी शाळेत प्रवेश घेण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे इंग्रजीचे आकर्षण.उच्च शिक्षण आजही मातृभाषेत मिळत नाही त्यामुळे पुढे मुलापुढे अडचणी निर्माण होतील हा विचार पालक करतात.जि.प. शाळेत इंग्रजी विषय असला तरी काही अपवाद सोडले इंग्रजीची अवस्था दयनीय आहे.यासंदर्भात शिक्षकांना कोणत्या व कशाप्रकारचे प्रशिक्षण हवे यासंदर्भात त्यांची मते विचारात घ्यायला हवीत.
               पर्यवेक्षीय यंत्रणेने सातत्याने शाळेला भेटी देऊन शिक्षकांना प्रोत्साहित करायला हवे.दरवर्षी १ शाळा दत्तक घेऊन त्यात सुधारणा करायला हवी.शिक्षकांमध्ये प्रेरणेचा अभाव आहे.पाठीवर नुसती थाप मारली तरी गुणवत्ता कशाशी खातात हे दाखवून देतील पण दुर्दैवाने असे होत नाही.
                आणखी महत्त्वाचं कारण अशैक्षणिक कामांचा होत असलेला मारा.अहवालांना दिले गेलेले अवास्तव महत्व. यात शिक्षकाचा कारकून कधी होतो हे त्याचे त्यालाच कळत नाही.तरीही या सगळ्यावर मात करीत तो आपले काम प्रामाणिकपणे करत असतो पण जेव्हा चुकीच्या धोरणांचा बळी त्याला देण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा काही क्षण तो निराश होतो व पुन्हा सगळे विसरून नव्याने कामाला सुरुवात करतो.
                 घटत्या पटसंख्येसाठी शिक्षकांना जबाबदार धरले जाते म्हणूनच या लेखाद्वारे वस्तुस्थिती मांडण्याचा हा प्रयत्न...धन्यवाद

           ........सुनिल पवार

सोमवार, २२ जून, २०१५

एकाग्रता

           माझी स्मरणशक्ती खूपच कमी आहे.मला थोड्या वेळापूर्वी ठेवलेली वस्तूदेखील सापडत  नाही, माझे मन एकाग्र होत नाही असे संवाद आपण  ऐकत असतो. पण असं काही नसतं.एक शिक्षक म्हणून काम करीत असताना आपल्याला अनुभव येतो की, मुलांची गाणी पाठ होत असतात. ज्यावेळेस अभ्यासाची वेळ येते तेव्हा मात्र मुलांचे लक्ष लागत नाही.पाठातील आशय त्यांना कंटाळवाणा वाटू लागतो.
           हे का घडते याचे कारण शोधायचा प्रयत्न करताना असे लक्षात येते की, एखादे काम करताना आपण जर दुसराच विचार करत असू तर नक्कीच विस्मरण,काम व्यवस्थित न होणे या गोष्टी घडतात. जी गोष्ट आपल्याला आवडत असते ती गोष्ट आपल्या लक्षात राहते, याउलट ज्यात आपल्याला रस नसतो अशी बाब स्मरणात राहत नाही.म्हणजे स्मरणशक्ती कमी असण्याचा मुद्दाच राहत नाही. अर्थातच एकाग्रता वाढवायची असेल तर जी गोष्ट करणार आहोत ती आवडीने करायला हवी. कोणतीही कृती करताना आपले लक्ष त्या कृतीवरच हवे.अर्जुनाने मला फक्त पक्ष्याचा डोळा दिसतो असे सांगितले व तोच लक्ष्यभेद करू शकला.आपण एकाच वेळेस मेंदूला अनेक गोष्टी करायला सांगत असू  तर एकही गोष्ट व्यवस्थित होत नाही.हे लक्षात घ्यायला हवे.
           आता हे सर्व ठीक आहे की,एकावेळेस एकच गोष्ट करायला हवी पण मन तर चंचल आहे त्याला ही सवय कशी लावायची हा मोठा प्रश्न आहे.साध्या साध्या गोष्टींपासून सुरुवात करू. सकाळी आपण दात घासतो.मनात वेगळेच विचार असतात.त्याऐवजी आपले अवधान ब्रशवर हवे.हात-पाय धुण्याचे काम चालू असेल तर त्यांच्याकडे प्रेमाने लक्ष द्यावे.जेवताना प्रत्येक घास घेताना त्याप्रती जागरुकता हवी.अशा छोट्या छोट्या गोष्टींनी हळूहळू एकाग्रता वाढू लागेल.मन हे जरी चंचल असले तरी एका क्षणाला एकाच गोष्टीचा विचार करू शकते हे लक्षात घ्यायला हवे.
            न्यूटनने अनेक शोध लावले.तो आपल्या कामात इतका मग्न होत असे की त्याला इतर गोष्टींचे भान राहत नसे.त्याबद्दलचे अनेक विनोद आपण वाचले आहेत पण त्याच्या एकाग्रतेमुळेच विज्ञानातील त्याचे योगदान अतुलनीय आहे.सचिन तेंडुलकरचा क्रिकेट हाच श्वास होता.परिणाम आपल्यासमोर आहे. आईचे आपल्या मुलावर प्रेम असते त्या प्रेमामुळेच ती त्याच्यासोबत तासनतास रमते.ही एकाग्रता नाही तर दुसरे काय  आहे?
            दैनंदिन जीवनातील काम असो अथवा गाठावयाचे ध्येय असो त्यात रुची घेऊन ते काम करायला हवे.अभ्यासात एखादा विषय आवडत  नसेल तर त्यात रुची कशी आणावी हा वैयक्तिक कौशल्यावर अवलंबून आहे.विषय मनोरंजक पद्धतीने कशाप्रकारे हाताळावा याबद्दल चर्चा पुढील लेखात करू.आपलेही अनुभव सांगा म्हणजे फलनिष्पत्ती सहज होईल.
                                                           ........सुनिल पवार

रविवार, २१ जून, २०१५

सावित्री



सावित्री,कशाला केलास अट्टाहास,
तू स्त्रियांना शिकवण्याचा
हालअ‍पेष्टा सहन करीत 
समाजाला बदलण्याचा

आम्ही नाही बदललो 
आम्ही नाही बदलणार  
मुलगी जन्माला येते म्हणून 
तिला गर्भातच संपवणार

एखादी आली जन्माला 
तरी तिचे भविष्य कसे घडणार
वासनेने बरबटलेलो आम्ही
तिची कोवळ्या वयातच शिकार करणार 

झालीच मोठी ती  तरी
प्रश्न नाही सुटणार
लग्नाचा बाजार मांडून
आम्ही तिला छ्ळणार

असेल रुपवान,गुणवान
त्याने फरक काय पडणार
हुंडा मिळाला नाही तर
तिला जाळून मारणार

काय म्हणालीस सावित्री, 
आता गप्प नाही  बसणार
झाशीच्या राणीसारखी
रणरागिणी होऊन लढणार

खूप उशीर केलास  
पण योग्य निर्णय लढण्याचा
झुगारुन टाक बंधने सारी
सोड  आधार पुरुषी कुबड्यांचा