रविवार, २१ जून, २०१५

सावित्री



सावित्री,कशाला केलास अट्टाहास,
तू स्त्रियांना शिकवण्याचा
हालअ‍पेष्टा सहन करीत 
समाजाला बदलण्याचा

आम्ही नाही बदललो 
आम्ही नाही बदलणार  
मुलगी जन्माला येते म्हणून 
तिला गर्भातच संपवणार

एखादी आली जन्माला 
तरी तिचे भविष्य कसे घडणार
वासनेने बरबटलेलो आम्ही
तिची कोवळ्या वयातच शिकार करणार 

झालीच मोठी ती  तरी
प्रश्न नाही सुटणार
लग्नाचा बाजार मांडून
आम्ही तिला छ्ळणार

असेल रुपवान,गुणवान
त्याने फरक काय पडणार
हुंडा मिळाला नाही तर
तिला जाळून मारणार

काय म्हणालीस सावित्री, 
आता गप्प नाही  बसणार
झाशीच्या राणीसारखी
रणरागिणी होऊन लढणार

खूप उशीर केलास  
पण योग्य निर्णय लढण्याचा
झुगारुन टाक बंधने सारी
सोड  आधार पुरुषी कुबड्यांचा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा