सोमवार, २२ जून, २०१५

एकाग्रता

           माझी स्मरणशक्ती खूपच कमी आहे.मला थोड्या वेळापूर्वी ठेवलेली वस्तूदेखील सापडत  नाही, माझे मन एकाग्र होत नाही असे संवाद आपण  ऐकत असतो. पण असं काही नसतं.एक शिक्षक म्हणून काम करीत असताना आपल्याला अनुभव येतो की, मुलांची गाणी पाठ होत असतात. ज्यावेळेस अभ्यासाची वेळ येते तेव्हा मात्र मुलांचे लक्ष लागत नाही.पाठातील आशय त्यांना कंटाळवाणा वाटू लागतो.
           हे का घडते याचे कारण शोधायचा प्रयत्न करताना असे लक्षात येते की, एखादे काम करताना आपण जर दुसराच विचार करत असू तर नक्कीच विस्मरण,काम व्यवस्थित न होणे या गोष्टी घडतात. जी गोष्ट आपल्याला आवडत असते ती गोष्ट आपल्या लक्षात राहते, याउलट ज्यात आपल्याला रस नसतो अशी बाब स्मरणात राहत नाही.म्हणजे स्मरणशक्ती कमी असण्याचा मुद्दाच राहत नाही. अर्थातच एकाग्रता वाढवायची असेल तर जी गोष्ट करणार आहोत ती आवडीने करायला हवी. कोणतीही कृती करताना आपले लक्ष त्या कृतीवरच हवे.अर्जुनाने मला फक्त पक्ष्याचा डोळा दिसतो असे सांगितले व तोच लक्ष्यभेद करू शकला.आपण एकाच वेळेस मेंदूला अनेक गोष्टी करायला सांगत असू  तर एकही गोष्ट व्यवस्थित होत नाही.हे लक्षात घ्यायला हवे.
           आता हे सर्व ठीक आहे की,एकावेळेस एकच गोष्ट करायला हवी पण मन तर चंचल आहे त्याला ही सवय कशी लावायची हा मोठा प्रश्न आहे.साध्या साध्या गोष्टींपासून सुरुवात करू. सकाळी आपण दात घासतो.मनात वेगळेच विचार असतात.त्याऐवजी आपले अवधान ब्रशवर हवे.हात-पाय धुण्याचे काम चालू असेल तर त्यांच्याकडे प्रेमाने लक्ष द्यावे.जेवताना प्रत्येक घास घेताना त्याप्रती जागरुकता हवी.अशा छोट्या छोट्या गोष्टींनी हळूहळू एकाग्रता वाढू लागेल.मन हे जरी चंचल असले तरी एका क्षणाला एकाच गोष्टीचा विचार करू शकते हे लक्षात घ्यायला हवे.
            न्यूटनने अनेक शोध लावले.तो आपल्या कामात इतका मग्न होत असे की त्याला इतर गोष्टींचे भान राहत नसे.त्याबद्दलचे अनेक विनोद आपण वाचले आहेत पण त्याच्या एकाग्रतेमुळेच विज्ञानातील त्याचे योगदान अतुलनीय आहे.सचिन तेंडुलकरचा क्रिकेट हाच श्वास होता.परिणाम आपल्यासमोर आहे. आईचे आपल्या मुलावर प्रेम असते त्या प्रेमामुळेच ती त्याच्यासोबत तासनतास रमते.ही एकाग्रता नाही तर दुसरे काय  आहे?
            दैनंदिन जीवनातील काम असो अथवा गाठावयाचे ध्येय असो त्यात रुची घेऊन ते काम करायला हवे.अभ्यासात एखादा विषय आवडत  नसेल तर त्यात रुची कशी आणावी हा वैयक्तिक कौशल्यावर अवलंबून आहे.विषय मनोरंजक पद्धतीने कशाप्रकारे हाताळावा याबद्दल चर्चा पुढील लेखात करू.आपलेही अनुभव सांगा म्हणजे फलनिष्पत्ती सहज होईल.
                                                           ........सुनिल पवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा