मंगळवार, २३ जून, २०१५

                         घटती पटसंख्या कारणे व उपाय

                  आज जि.प.शिक्षकांच्या व ज्यांचं ख-या अर्थाने जि.प. शाळेवर प्रेम आहे या सर्वांसाठी काळजीचा विषय म्हणजे मराठी शाळांची घटती पटसंख्या हे आहे. याबाबत कारणांचा व उपायांचा या लेखात आपण विचार करू या.
                  गांधीजींनी सांगितले होते की, खेड्यांकडे चला.पूर्वी खेडी स्वयंपूर्ण होती परंतु स्वातंत्र्य प्राप्तीनंतर परिस्थिती बदलली.शहराकडे रोजगारासाठी शहरात जाणा-यांचे प्रमाण वाढले.त्यामुळे शहरातील शाळा वाढत्या पटामुळे भराभरा वाढू लागल्या तर ग्रामीण भागात याउलट पट कमी होऊ लागला.आजही आपला प्रमुख व्यवसाय शेती आहे.त्याला पूरक असे व्यवसाय गावातच निर्माण झाले तर स्थलांतराचा प्रश्न सुटेल. मराठी शाळांच्या पटाशी या मुद्याची सांगड घालणे हास्यास्पद वाटेल.पण कोकणातील आजची परिस्थिती पाहिली तर कोणालाही हे पटेल.
                  दुसरा मुद्दा पूर्व प्राथमिक शिक्षण जि.प.शाळांना जोडून नसल्याचा. आज पालकांना असे वाटते की माझा मुलगा अभ्यासात अव्वल असावा, नृत्यात निपुण असावा,कराटे खेळता यावे ,सारेगमप मध्ये तो चमकावा. मग अडीच ते तीन वर्षापासूनच मुलाला खासगी शाळेत प्रवेश दिला जातो. जि.प.शाळेत येणारा मुलगा अंगणवाडीत गेलेला असेलच अशी खात्री देता येत नाही शिवाय  अंगणवाडी ताईंनाही अहवाल व इतर कामे यातून वेळ मिळेलच असं आपण म्हणू शकत नाही .
                 खासगी शाळेत प्रवेश घेणारे बहुतांश सुशिक्षित वर्गातील असतात त्यामुळे पाल्याच्या प्रगतीबाबत ते दक्ष असतात.भरमसाठ डोनेशन घेतले जाते व नंतर गुणवत्ता दाखवली जाते.अर्थात गुणवत्ता म्हणजे काय असंही विचारले जाऊ शकते पण तो आपल्या लेखाचा विषय नाही.जि.प. शिक्षक मात्र गोरगरिबांची मुले शिकवत असतो आणि त्याबद्दल त्याची तक्रारही नसते कारण तो देखील त्याच स्थितीतून आलेला असतो. यातूनही जेव्हा मुले गुणवत्ता यादीत झळकतात तेव्हा ही या विषम व्यवस्थेला लगावलेली चपराक असते.
               खासगी शाळेत प्रवेश घेण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे इंग्रजीचे आकर्षण.उच्च शिक्षण आजही मातृभाषेत मिळत नाही त्यामुळे पुढे मुलापुढे अडचणी निर्माण होतील हा विचार पालक करतात.जि.प. शाळेत इंग्रजी विषय असला तरी काही अपवाद सोडले इंग्रजीची अवस्था दयनीय आहे.यासंदर्भात शिक्षकांना कोणत्या व कशाप्रकारचे प्रशिक्षण हवे यासंदर्भात त्यांची मते विचारात घ्यायला हवीत.
               पर्यवेक्षीय यंत्रणेने सातत्याने शाळेला भेटी देऊन शिक्षकांना प्रोत्साहित करायला हवे.दरवर्षी १ शाळा दत्तक घेऊन त्यात सुधारणा करायला हवी.शिक्षकांमध्ये प्रेरणेचा अभाव आहे.पाठीवर नुसती थाप मारली तरी गुणवत्ता कशाशी खातात हे दाखवून देतील पण दुर्दैवाने असे होत नाही.
                आणखी महत्त्वाचं कारण अशैक्षणिक कामांचा होत असलेला मारा.अहवालांना दिले गेलेले अवास्तव महत्व. यात शिक्षकाचा कारकून कधी होतो हे त्याचे त्यालाच कळत नाही.तरीही या सगळ्यावर मात करीत तो आपले काम प्रामाणिकपणे करत असतो पण जेव्हा चुकीच्या धोरणांचा बळी त्याला देण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा काही क्षण तो निराश होतो व पुन्हा सगळे विसरून नव्याने कामाला सुरुवात करतो.
                 घटत्या पटसंख्येसाठी शिक्षकांना जबाबदार धरले जाते म्हणूनच या लेखाद्वारे वस्तुस्थिती मांडण्याचा हा प्रयत्न...धन्यवाद

           ........सुनिल पवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा