शनिवार, १९ डिसेंबर, २०१५

गणित अंकज्ञान उपक्रम


आज इयत्ता पहिली ते तिसरी वर्गासाठी गणित विषयाची एक अ‍ॅक्टिव्हीटी घेतली प्रतिसाद एकदम मस्त.
छोट्या पुठ्ठ्यावर 1 ते 9 अंक पेंट करून घेतले. नऊ मुलांना नऊ कार्डबोर्ड दिले. एक ते नऊ पैकी कोणताही एक अंक उच्चारला तर ज्या विद्यार्थ्याकडे तर तो अंक असेल तो विद्यार्थी उठून थांबेल.
नंतर 12, 54, 35 असे अंक उच्चारले की दोन विद्यार्थी तो अंक बनवले. चुक झाली तर पुन्हा एकदा संधी दिली. 
नंतर मुलांना मी अंक सांगितले व ते त्यांनी ते तयार केले. या छोटय़ा उपक्रमात मजा आली व शिकण्याचा आनंदही. उद्या 100 च्या पुढे..............!
धन्यवाद!
शिक्षकमिञ राजेभोसले

गुरुवार, १७ डिसेंबर, २०१५

शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

दिवाळी

चांदोबा तुझ्या घरी रोजच दिवाळी
पणत्या दिसती मला रोज आभाळी

    लाडू, चकल्या करते का तुझी आई
    फराळाला येऊ का मी आणि ताई

उटणे लावून करु आपण दोघे स्नान
ताई काढेल रांगोळी अंगणात छान

    फुलबाजी आणि फटाके उडवायचे का
    आवाज करुन ताईला चिडवायचे का

मोठा आकाशकंदील आपण लावू या
दोघे मिळून आनंदाने गाणे गाऊ या

                     -------सुनिल पवार

बुधवार, ९ डिसेंबर, २०१५

सवंगडी


कावळेदादा, कावळेदादा एकटा आहे मी घरी
किती दिवस झाले तू आला नाहीस दारी

चिऊताई चिऊताई जाऊ नकोस लांब
दाणे देतो, पाणी देतो इथे जरा थांब

खारूताई खारूताई दिसत नाहीस आता
शोधून काढीन तुला तू दे मला पत्ता

नाजूक साजूक फुलपाखरू गेले कुठे रुसून
हात लावणार नाही त्याला लांबून पाहीन बसून

कबुतरा रे कबुतरा माझा मित्र बनशील का ?
आठवण काढतोय बाळ आईला निरोप देशील का ?
      
                      ......सुनिल पवार

रविवार, २९ नोव्हेंबर, २०१५

चिऊ आली चिऊ आली

चिऊ आली चिऊ आली
उडत ती खाली आली

तिकडून आला बाळ
घालूनी सुंदर माळ

बाळ बोले चिऊताई
किती ग ऊशीर बाई

दमलो पाहून वाट
केवढा हा तुझा थाट

आईने दिलेत दाणे
एेकव ना गोड गाणे

चिऊ आली चिऊ आली
हसतो तो बाळ गाली


-----सुनिल पवार

शनिवार, ७ नोव्हेंबर, २०१५

आई

    आई म्हणूनी आता कोणाला साद घालू
    आठवणीतच उरली ती कुणासवे मी चालू

होती आई जेव्हा माझे मीपण जपलेले
 शोधत आहे अजुनी ते बालपण हरवलेले

   जवळून वाहत नाही आता मायेचा झरा
   रुसुनी गेला आहे येथून वाहता वारा

थकुनी जेव्हा येतो आई तुलाच आठवतो
  लवकर निघून ये ना आई निरोप पाठवतो

    किती केली तुला विनवणी तरी नाही आली
    फुलत नाही खरेच आता हसू माझ्या गाली

सुखे लोळती पायाशी पण सोबत तू नाही
 तूच हवी माझ्या पाठीशी, नको मला काही

----- सुनिल पवार

s
सावित्री

मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०१५

आरगुंडीपासून गुलाबाचे फूल

सोमवार, २ नोव्हेंबर, २०१५

रविवार, १ नोव्हेंबर, २०१५

स्टॉकिंगपासून फूल

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०१५

सोलावूडपासून फुलाची निर्मीती

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

पसायदानाचा अर्थ…


प सा य दा न
आता विश्वात्मके देवे |
येणे वाग्यज्ञे तोषावे |
तोषोनि मज द्यावे पसायदान हे |
आता म्हणजे ज्ञानेश्वरी लेखन पूर्ण झाल्यावर ज्ञानेश्वर विश्वात्मक असा जो सर्व धर्मातीत देव त्याला विनंती करत आहेत की त्याने ह्या वांग्मय यज्ञाने प्रसन्न व्हावे आणि मला या प्रसादाचे दान द्यावे. सर्व विश्व हेच माझे घर आहे, नव्हे आपणच सर्व विश्व जो बनला आहे अशा अात्मानुभूतीने संपन्न आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथाना त्यांनी विश्वात्मक ही उपाधी दिली आहे. यज्ञ म्हणजे निष्काम भावाने केलेले कर्म अशी व्याख्या गीतेने केली आहे. गीतेवरील टीका हा वांग्मय यज्ञ आहे असे ते म्हणतात. या यज्ञाने प्रसन्न होऊन गुरुनी प्रसाद द्यावा असे ते म्हणतात…
जे खळांची व्यंकटी सांडो |
तया सत्कर्मी रती वाढो |
भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे |
जे चा संबंध मागच्या ओवीशी आहे. मला या प्रसादाचे दान द्या कि, असा त्याचा अन्वय लावून येथून पुढे कोणत्या गोष्टी मिळाव्यात त्याचा उल्लेख आहे…
खल म्हणजे दुष्ट, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा. सर्वप्रथम दुष्टांचे दुष्टपण सुटावे असे मागणे मागितले आहे. त्यांना सत्कर्माची आवड उत्पन्न होवो असे झाले म्हणजे कोणाशी त्याचे शत्रुत्व राहणार नाही. सर्व प्राण्यांमध्ये मैत्रीचा व्यवहार होईल. मनुष्याच्या प्रवृत्तीला तो स्वतःच जबाबदार आहे, त्याने स्वतःच स्वताचा उध्दार करायचा आहे असे भगवंत येथे सुचवतात…
दुरितांचे तिमिर जावो |
विश्व स्वधर्मसूर्ये पाहो |
जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात|
दुरित म्हणजे पाप, तिमिर म्हणजे अंधार, पापरूपी अंधाराचा नाश होवो. सगळ्या विश्वाने स्वधर्मरूप सूर्याच्या प्रकाशात पाहावे मग सर्व प्राण्यांना ज्याला जे हवे असेल ते मिळेल.
पाप म्हणजे काय?
सत्व रज आणि तम या तीन गुणांच्या कमी-अधिक प्राबल्याने मनुष्याचे आचरण बनते. रज, तम च्या जोराने काम आणि त्यामुळे लोभ, मद, मोह, मत्सर हे शत्रू बलवान होतात, मानव पापाचरणास प्रवृत्त होतो. म्हणून स्वधर्म म्हणजे निष्कामवृत्तीने कर्माचरण. हा गीतेचा मुख्य विषय आहे. भागवतधर्माचे सारही हेच आहे. स्वधर्म आचरणाच्या प्रकाशात सर्वाना पाहिजे ते मिळेल असे ज्ञानेश्वर म्हणतात.
वर्षत सकल मंगली |
ईश्वर निष्ठांची मांदियाळी |
अनवरत भूमंडली | भेटतु या भूता |
या पृथ्वीतलावर संपूर्ण मांगल्याचा अखंड वर्षाव करणारा ईश्वरनिष्ठांचा समुदाय सर्व प्राण्यांना भेटो. श्रेष्ठ पुरुष जे आचरण करतो त्याचे समाज अनुकरण करतो. त्याच्या वागण्यातून सामान्यांना धर्म कळतो. त्याच्या हृदयातील ज्ञानदिपाच्या प्रकाशात योग्य मार्ग दिसतो. ईश्वरनिष्ठ आपल्या आत्मज्ञानाने पूर्णतया संसाराकडे पाठ फिरवून मुक्त झालेला असतो, पण समाज हिताकरता त्याने कर्मत्याग न करता लोकसंग्रह करीत समाजाचा एक घटक म्हणून जगले पाहिजे. याकरता श्रीकृष्णांनी स्वत:चे उदाहरण दिले आहे. गीतेची हीच शिकवण आहे समाजातील सर्वांचेच आचरण शुध्द झाले पाहिजे, तरच ईश्वरनिष्ठांची मांदियाळी म्हणजे मोठा समूह तयार होईल. हे श्री ज्ञानदेवांचे मागणे आहे.
चला कल्पतरूंचे आरव |
चेतना चिंतामणीचे गाव |
बोलते जे अर्णव | पीयूषांचे |
ईश्वर निष्ठांचे वर्णन करण्यासाठी येथे ज्ञानेश्वरांनी तीन काव्यमय उपमा दिल्या आहेत. जे चालणारे कल्पतरूंचे बगीचे आहेत सजीव अशा चिंतामणीचे गाव आहेत अमृताचा बोलणारा समुद्र आहेत. चल म्हणजे चालणारा. कल्पतरू म्हणजे जे मागाल ते देणारे झाड. पण त्याच्याकडे आपल्याला जावे लागते, तर सज्जन मात्र कल्पतरू तर आहेतच, शिवाय तेच स्वतः तुमच्याकडे येतात. शिवाय ते कल्पतरू प्रमाणे एकच नाहीत, तर त्यांची बागच आहे. चिंतामणी म्हणजे जे चिंताल ते देणारा दगड. संतही जे चिंताल ते देतात म्हणून ते चिंतामणी आहेत, शिवाय ते सजीव असल्याने देताना योग्य व अयोग्य याचा विवेक बाळगतात, आणि चिंतामणी प्रमाणे ते दुर्मिळ नाहीत, तर त्यांचे समूह आहेत.
अमृताचा एक थेंब अमरत्व देतो, संत हे अमृताचा बोलणारा सागर आहेत म्हणून ते साऱ्या समाजाला अमर करू शकतात.
चंद्रमे जे अलांछन | मार्तंड जे तापहीन |
तेसर्वाही सदा सज्जन | सोयरे होतु |
येथे संतांची तुलना चंद्र आणि सूर्याशी केली आहे . जे डाग नसलेले चंद्र आहेत, उष्णता नसलेले सूर्य आहेत, असे सज्जन सर्वांचे सोयरे, नातेवाईक होवोत अशी प्रार्थना ते करतात. संत हे चंद्राप्रमाणेच शीतल आणि आनंद देणारे असतात. चंद्र चांदण्याचा वर्षाव करून अंधार नाहीसा करतो, तसेच संत स्वधर्म आचरणाने पापाचा अंधार नाहीसा करून मंगलतेच्या चांदण्याचा वर्षाव करतात, चंद्रावर डाग आहेत, पण संतांचे चारित्र्य निर्मल आहे. सूर्य जगाला प्रकाश आणि उष्णता देतो, पण तो दाहक आहे, संत ज्ञानाचा प्रकाश देतात पण ते दाहक नाहीत. अशाप्रकारे गीतेतील तत्वज्ञानाचे मूर्त स्वरूप असे जे संत, त्यांचे श्रेष्ठत्व श्री ज्ञानेश्वर वर्णन करतात.
किंबहुना सर्वसुखी |
पूर्ण होऊनी तिन्ही लोकी |
भजिजो आदिपुरुषी | अखंडित |
स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकातील सर्वांनी सर्व प्रकारे सुखी होऊन त्यांनी आदिपुरुषाची अखंडित भक्ती करावी अशी प्रार्थना ज्ञानेश्वर करतात. दुष्ट पुरुषाची दुर्बुद्धी नाहीशी होऊन त्याला सत्कर्मात रती उत्पन्न होईल. पापाचा अंधार नाहीसा होऊन स्वधर्माचा सूर्योदय होईल. ईश्वर निष्ठांचे समूह मांगल्याचा वर्षाव करतील. चारित्र्यवान पुरुष सर्व प्राणिमात्राचे सोयरे होतील. असे आदर्श समाजचित्र सुखी जीवनाचा मार्ग आहे. समाजाचे सर्व घटक सदाचरणी झाल्याशिवाय सर्व सुखी होणार नाहीत. आदिपुरुष म्हणजे परमात्मा. जो हे जाणतो कि परमात्माचे सर्वत्र अस्तित्व आहे, तो स्वतः त्याच्याशी एकरूप होतो. भक्त आणि भगवंत यात भेद उरत नाही. या आदिपुरुषाची पूजा करावी स्वकर्म -कुसुमानि. हेच त्याचे भजन होय.
आणि ग्रंथोपजीविये | विशेषी लोकीं इये |
दृष्ठादृष्ठविजयें | होआवें जी |
आणि विशेषतः या जगात हा ग्रंथ ज्यांचे जगण्याचे साधन, आधार झाला आहे, त्यांना दृष्ट आणि अदृष्ट दोन्ही विजय मिळोत. गीतेत कर्मयोग आणि भक्ती हे परमात्म्यापर्यंत सर्वाना पोहोचण्याचे जे मार्ग सांगितले आहेत त्यासाठी साधनेची, ज्ञान किंवा योग मार्गातील तपस्येची गरज नाही. आपले सामान्य जीवन जगताना गीतेने सांगितलेल्या सत्वगुण युक्त मार्गाने चालले आणि परमात्म्याचे सतत नामस्मरण केले, तर या जीवनात म्हणजे दृष्ठ आणि मरणोत्तर म्हणजे अदृष्ट असे दोन्ही विजय लाभतील असे श्री ज्ञानेश्वर म्हणतात. जीवनात आणि जीवनोत्तर नैतिकतेने विजयी होणे ह्याला भारतीय तत्वज्ञान जे महत्व देते तेच त्याचे वेगळेपण आहे.
तेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो |
हा होईल दान पसावो |
येणे वरे ज्ञान देओ | सुखिया झाला |
तेंव्हा विश्वाचे राजे म्हणले “या प्रसादाचे दान मिळेल.” या वरामुळे ज्ञानेश्वरांना आनंद झाला. श्री निवृत्तीनाथ गुरु यांना येथे विश्वाचा राजा म्हणून संबोधिले आहे. ते म्हणाले कि ही ग्रंथरचना करताना ज्ञानेश्वरांनी जे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश ठेवला तो सफल होवो. या मराठी भाषेच्या नगरी ब्रह्मविद्या इतकी सर्वां पर्यंत पोहोचो की जग सुखमय होवो. श्रोत्यांनी मन एकाग्र करून या ग्रंथाचे श्रवण केले आणि त्याप्रमाणे आचरण केले तर ते सुखी होतील हे ज्ञानेश्वरांची प्रतिज्ञा पूर्ण होवो. अशा रीतीने या वाकयज्ञाचा उद्देश पूर्ण झाला म्हणून ज्ञानेश्वरांना आनंद झाला.

रविवार, २५ ऑक्टोबर, २०१५

सुत्रसंचालन

1)
आभाराचा भार कशाला
आभाराचा हार कशाला
ह्रदयातच  जर घर बांधायचे
तर मग त्याला दार कशाला

2)
मी आपले आभार मानणार नाही
कारण त्यात भार आहे
मी धन्यवाद देखील म्हणणार नाही
कारण त्यात वाद आहे
आपल्याला ऋणानुबंध स्थापित करायचे आहेत
म्हणून मी ऋणनिर्देश करण्यासाठी उभा आहे

3)
कधी न व्हावा वियोग अपुला
अशीच नाती सदा असावी
बकुळ फुलांची अक्षयगंधा
अशीच प्रीती सदा असावी

4)

यापुढे यशाकडे अशीच झेप घ्यायची
शक्ती,युक्ती,बुद्धीने सुजाण यज्ञ चालवू
संपदा,समर्थता उदंड आम्ही मेळवू
सावधान!पाऊले जयाप्रतीच न्यायची
यापुढे यशाकडे......

5)
थोर महात्मे होऊन गेले
चरित्र त्यांचे पहा जरा
आपण त्यांच्या समान व्हावे
हाच सापडे बोध खरा

6)
मन शांत, प्रसन्न आणि उल्हासित ठेवण्याचे सामर्थ्य प्रार्थनेत असते
त्यात अंधश्रद्धेचा कोणताही भाग नसतो.
काळजातला अंधकार आणि चिंता प्रार्थनेने नाहीशा होतात.
मनापासून केलेल्या प्रार्थनेमुळे अकल्पित आणि अनपेक्षित मनःशांती मिळते.

7)
स्वतःसाठी काही करता आलं नाही
तरी इतरांसाठी जगून बघावं
दुसर्‍यांच्या डोळ्यातील आसवं पुसताना
त्यात आपलं प्रतिबिंब बघावं

8)

जीवनात यशस्वी होणं प्रत्येकाच्याच नशीबात आहे असं नाही पण प्रयत्नवादी कधी 100 % अपयशी होत नाही म्हणून
गरुडाकडून पंख घ्या भरारी मारण्यासाठी
सूर्याकडून तेज घ्या अंधाराच्या नाशासाठी
पर्वताकडून निश्चय घ्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी
फुलाकडून सुवास घ्या दुःखात सुद्धा हसण्यासाठी
काट्याकडून धार घ्या अन्यायाच्या नाशासाठी
आभाळाकडून विशाल सांधे घ्या चुका माफ करण्यासाठी
वार्‍याकडून वेग घ्या प्रगतीपथावर अग्रेसर होण्यासाठी
आमच्याकडून शुभेच्छा घ्या जीवनात यशस्वी होण्यासाठी

9)
फैसला होने से पहले
   भला क्यू हार माने
दुनिया अभी जीती नही
   तू अभी हारा नही

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०१५

शाळा म्हणजे काय ?

शाळा म्हणजे काय रे भाऊ
एकदा मला कुणीतरी सांगा
प्रवेश घ्यायला या शाळांमध्ये
का लागतात दूरवर रांगा

नाही मला सुंदर गणवेश
बेल्ट आणि त्याच्यासोबत टाय
मम्मी नाही आणि पप्पाही नाही
सांगा मी त्यांना करू कसा बाय

नीटनेटकी तयारी करुन
मी कधीच गेलो नाही शाळेत
तुमचे बुट पॉलीश करण्या
मात्र येतो मी अगदी वेळेत

शिकून सवरून मोठे व्हावे
ही स्वप्ने मला पडत नाहीत
वाढ होणे थांबवता येत नाही
एवढेच मला आहे माहीत

शाळा तुमच्या सुंदर आहेत
पण आम्हाला त्यात स्थान नाही
समता आहे बोलण्यापुरतीच
पैसा नाही त्याला सन्मान नाही

तुमच्या समृद्ध परंपरांचा
तुम्हाला खासा अभिमान आहे
दूर सारून आम्हाला बोलता
भारत आमचा महान आहे

तुम्ही माझे अस्तित्व नाकारले
तरी स्वतःसाठी मी खास आहे
पोटाचीच भूक सर्वात मोठी
यावरच माझा विश्वास आहे

खूप अपेक्षा नाहीत आमच्या
समजून घ्या आमच्या भावना
व्यवस्थेचे बळी असलो तरी
केवळ एकदा माणूस माना
...........सुनील पवार

गुरुवार, २ जुलै, २०१५

टिश्यू पेपरपासून अस्टरचे फूल


शाळांमधील आवश्यक भौतिक सुविधा



बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009(R.T.E.) नुसार प्राथमिक शाळांमध्ये किमान कोणत्या भौतिक सुविधा असणे आवश्यक आहे. ?
उत्तर
:
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (R.T.E.) नुसार प्राथमिक शाळांमध्ये खालील भौतिक सुविधा असणे आवश्यक आहे
1) इमारत 
2) मुख्याध्यापक कार्यालय /भांडार खोली
3) प्रत्येक शिक्षकास वर्ग खोली
4) मुलींसाठी स्वंतत्र स्वच्छतागृह
5) मुलांसाठी स्वंतत्र स्वच्छतागृह
6) पिण्याच्या पाण्याची सुविधा
7) खेळाचे मैदान
8) रँप
9) किचन शेड
10) संरक्षक भिंत

शालेय (अभिलेख ) दप्तर

१ )  जनरल रजि .नं. १
२ )  जनरल किर्द रजिस्टर
३)  शालेय व्यवस्थापन समिती अजेंडा व ठराव रजिस्टर
४ )  सर्व शिक्षा अभियान अंतर्गत प्राप्त अनुदान रजिस्टर
५ )  माता पालक संघ रजिस्टर
६ )  ग्रामसभा तथा पालक सभा रजिस्टर
७ ) परिपाठ रजिस्टर
८ ) सांस्कृतिक कार्यक्रम रजिस्टर
९ )  दैनिक गोषवारा रजिस्टर
१०) पटनोंदणी रजिस्टर
११) शालेय पोषण आहार दैनिक नोंद रजिस्टर
१२) शालेय पोषण आहार व माध्यान्ह भोजन मानधन वाटप रजिस्टर
१३) उपस्थिती भत्ता बिल रजिस्टर
१४) हालचाल रजिस्टर
१५) भेट रजिस्टर ( अभिप्राय रजिस्टर)
१६) स्पर्धा परीक्षा रजिस्टर
१७) मुख्याध्यापकाचे लॉगबुक
१८) शिक्षक प्रशिक्षण नोंद रजिस्टर
१९) विद्यार्थी वैद्यकिय तपासणी नोंदपत्रिका
२०) रजेच्या कालावधीतील शिक्षक व्यवस्थारजिस्टर
२१) पुस्तक वाटप रजिस्टर
२२) चार्ज देव घेव रजिस्टर
२३) गणवेश वाटप रजिस्टर
२४) सर्व शिक्षा अभियान अंतर्गत साहित्य वाटप रजिस्टर
२५) वाचनालय पुस्तक नोंद व वाटप रजिस्टर
२६)  लेट मस्टर
२७ ) जनरल किर्द रजिस्टर
२८ ) मिना-राजू मंच रजिस्टर
२९ ) पालक भेट
३० ) आरोग्य तपासणी रजिस्टर
३१)  शिक्षक पालक रजिस्टर
३२ ) शिक्षक विद्यार्थी सूचना रजिस्टर
३३) पुस्तक वाटप रजिस्टर
३४) सहशालेय उपक्रम रजिस्टर

बुधवार, १ जुलै, २०१५

वंदे मातरम



वंदे मातरम
वंदे मातरम् | सुजलां, सुफलां,मलयज शीतलाम |
सस्य शामलाम् ,मातरम ||
शुभ्र ज्योत्स्ना - पुलकित - यामिनीम्
फुल्ल - कुसुमित द्रुमदल शोभिनीम् |
सुहासिनीम् सुमधुर - भाषिणीम्
सुखदाम् वरदाम् मातरम् || वंदे मातरम् ||
बंकिमचंद्र चॅटर्जी
वंदे मातरमचा अर्थ
माते, मी तुला वंदन करतो. जलाने परिपूर्ण अन् धनधान्याने समृद्ध ; मल्य पर्वतावरील चंदनाने सुगंधी बनलेल्या वायुलहरींमुळे शीतल होणा-या नि विपुल पिकांमुळे श्यामलवर्ण दिसणा-या हे माते तुला वंदन असो.
शुभ्र चांदण्यांमुळे तुझ्या रात्री आल्हाददायक असतात ; तर फुलांच्या बहरांनी नटलेल्या वृक्षराजींनी तू शोभतेस ; हसतमुख नेहमी मधुर बोलणारी, सुख देणारी, वरदायिनी अशा हे माते मी तुला वंदन करतो.

मंगळवार, ३० जून, २०१५

सामान्य ज्ञान

माझा भारत



देश : भारत, INDIA
राष्ट्रध्वज : तिरंगा ( केशरी, पांढरा व हिरवा या तीन रंगांचे आडवे पट्टे.पांढ-या रंगाच्या मध्यभागी २४ आरे असलेले अशोकचक्र)
लांबी व रुंदीचे प्रमाण ३:२
राजधानी : नवी दिल्ली
राज्यपद्धती : संघराज्य
राष्ट्रगीत : जन- गण- मन
राष्ट्रीय गीत : वंदे मातरम
झंडा गीत : विजयी विश्व तिरंगा प्यारा
राजमुद्रा : सारनाथ स्तंभावरील चार सिंह असलेली मुद्रा
ध्येय वाक्य : सत्य - मेव - जयते
राष्ट्रभाषा : हिंदी
राष्ट्रीय पक्षी : मोर
राष्ट्रीय प्राणी : वाघ(बंगाली वाघ) १९७२ पर्यंत सिंह होता.
राष्ट्रीय फूल : कमळ
राष्ट्रीय फळ : आंबा
राष्ट्रीय खेळ : हॉकी
राष्ट्रहित : अहिंसा
राष्ट्रलिपी : देवनागरी
स्वातंत्र दिन : १५ ऑगस्ट
प्रजासत्ताक दिन : २६ जानेवारी
भौगो.क्षेत्र : ३२,८७,२६३ चौ.कि.मी.

राष्ट्रगीत व अर्थ

जनगणमन -अधिनायक जय हे
भारत - भाग्यविधाता |
पंजाब, सिंधु, गुजरात मराठा,
द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत - भाग्यविधाता |
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
राष्ट्रगीताचा अर्थ :
लोकांच्या मनावर अधिष्ठीत झालेल्या हे भारत भाग्य विधात्या, तुझा जयजयकार असो. तू जनतेच्या ह्रदयाचा स्वामी आहेस. भारताचा भाग्यविधाता आहेस. पंजाब, सिंधू नदीकाठचा(उगमाजवळचा) प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, ओरिसा,बंगाल या सर्व प्रदेशांना तुझा जयघोष जागृत करतो. विंध्यांद्रि व हिमालय या ठिकाणी तुझे यशोगान ऐकू येते. गंगा यमुना यांच्या प्रवाह संगितात निनादते. उसळणा-या सागराच्या लाटा तुझ्या नावांचा गजर करतात. हे सर्वजण तुझा आशीर्वाद मागतात. तुझी कीर्ती गातात. तू सर्वांचे मंगल करणारा आहेस, तुझा जयजयकार असो.

रविवार, २८ जून, २०१५

जुलै दिनविशेष



१ - महाराष्ट्र कृषी दिन
२ - तामिळनाडूमधील कल्पकम येथे अणुऊर्जा केंद्राची स्थापना (१९८३)
३ - भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ (१८५५)
४ - स्वामी विवेकानंद यांचा स्मृतिदिन (१९०२) 
     कान्होजी आंग्रे पुण्यतिथी
५ - आझाद हिंद सेनेची स्थापना (१९४३)
      जलसंपत्ती दिन
६ - व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्मदिन (१९२७)
७ - भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना (१९१०)
८ - सावरकरांची समुद्रातील ऐतिहासिक उडी (१९१०)
९ - वन्यजीवन संघटनेमार्फत वाघ हा राष्ट्रीय प्राणी घोषित केला.
१० - क्रिकेटवीर सुनिल गावसकर यांचा जन्मदिन (१९५४)
११ - नारायण हरी आपटे यांचा जन्मदिन (१८८९)
       जागतिक लोकसंख्या दिन
१२ - संत सावता माळी यांचा समाधी दिन (१२९५)
१३ - मराठी कवयित्री इंदिरा संत यांचा स्मृतिदिन (२०००)
१४ - गोपाळ गणेश आगरकर जन्मदिन (१८५६)
१५ - बालगंधर्वांचा स्मृतिदिन (१९६७)
१६ - नानासाहेब पेशवे यांचा पराभव होऊन पेशवाईचा पराभव
       (१८५७)
१७ - रामदास बोटीला जलसमाधी (१९४७)
१८ - मुंबई विद्यापीठाची स्थापना (१८५७)
        लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन (१९६९)
१९ - भारतातील चौदा बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.(१९६९)
२० - अमेरिकेचा अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर उतरला. (१९६७)
२१ - क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना इंग्रजांनी अटक केली.(१८७९)
२२ - आपल्या तिरंगी झेंड्याची राष्ट्रध्वज म्हणून स्वीकृती(१९४७)
२३ - चंद्रशेखर आझाद जन्मदिन (१९०६)
        लोकमान्य टिळक यांचा जन्म (१८५६)
२४ - पन्नालाल घोष जन्मदिन (१९१९)
२५ - जगातील पहिल्या टेस्टट्यूब बेबीचा जन्म (१९७८)
२६ - राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन (१८७४)
२७ - इंग्लिश रसायन शास्त्रज्ञ जॉन डाल्टन स्मृतिदिन (१८४४)
२८ - पहिल्या महायुद्धास सुरुवात (१९२४)
२९ - ज्येष्ठ स्वातंत्रसेनानी अरुणा असफ अली यांचा स्मृतिदिन (१९९६)
३० - महाकवी तुलसीदासांचा स्मृतिदिन(१६२३)
३१ - जगन्नाथ शंकरशेठ स्मृतिदिन (१८६५)

गुरुवार, २५ जून, २०१५

शिक्षका तुझी भूमिका

शिक्षका तुझी भूमिका

तुझी भूमिका शिक्षकाची
साधना करीत राहा विद्येची
आता माघार कशाला
कर उन्नती बालकांची ||१||

मुले म्हणजे गुलाबाची फुले
त्यांना हळुवार जपायचं
कधी हसवायचं कधी नाचवायचं
त्यातूनच त्यांना शिकवायचं ||२||

विचारा प्रश्न कृती करून घ्या
योजा उपक्रम वापरा साधनतंत्रं
शिकून मोठं व्हायचंय तुला
सुजाण नागरिक होण्याचा द्या कानमंत्र ||३||

शैक्षणिक बदलासाठी प्रशिक्षण योजले
साधनव्यक्ती, केंद्रप्रमुख सारी यंत्रणा जोडली
खोलीपासून शौचालय दिली शैक्षणिक खेळणी
आता कर एकच अध्यापनासह घे उजळणी
जरी स्वातंत्र्य दिले तुला कर पालन आर टी ई चं ||४||

लावल्या कलमाच्या शृंखला
नको छडी मारू ना शब्दाने दुखवायचं
असतील शंका आल्या तुज समस्या
पालक व्यवस्थापन सदस्यांना भेटायचं
उद्बोधनातून गोड बोलून
आपलं उद्दिष्ट दर्जेदार शिक्षण साधायचं ||५||

चंद्रकांत दत्तू कांबळे
पदवीधर शिक्षक
रा.जि.प.शाळा उमरठ ता.पोलादपूर

मंगळवार, २३ जून, २०१५

                         घटती पटसंख्या कारणे व उपाय

                  आज जि.प.शिक्षकांच्या व ज्यांचं ख-या अर्थाने जि.प. शाळेवर प्रेम आहे या सर्वांसाठी काळजीचा विषय म्हणजे मराठी शाळांची घटती पटसंख्या हे आहे. याबाबत कारणांचा व उपायांचा या लेखात आपण विचार करू या.
                  गांधीजींनी सांगितले होते की, खेड्यांकडे चला.पूर्वी खेडी स्वयंपूर्ण होती परंतु स्वातंत्र्य प्राप्तीनंतर परिस्थिती बदलली.शहराकडे रोजगारासाठी शहरात जाणा-यांचे प्रमाण वाढले.त्यामुळे शहरातील शाळा वाढत्या पटामुळे भराभरा वाढू लागल्या तर ग्रामीण भागात याउलट पट कमी होऊ लागला.आजही आपला प्रमुख व्यवसाय शेती आहे.त्याला पूरक असे व्यवसाय गावातच निर्माण झाले तर स्थलांतराचा प्रश्न सुटेल. मराठी शाळांच्या पटाशी या मुद्याची सांगड घालणे हास्यास्पद वाटेल.पण कोकणातील आजची परिस्थिती पाहिली तर कोणालाही हे पटेल.
                  दुसरा मुद्दा पूर्व प्राथमिक शिक्षण जि.प.शाळांना जोडून नसल्याचा. आज पालकांना असे वाटते की माझा मुलगा अभ्यासात अव्वल असावा, नृत्यात निपुण असावा,कराटे खेळता यावे ,सारेगमप मध्ये तो चमकावा. मग अडीच ते तीन वर्षापासूनच मुलाला खासगी शाळेत प्रवेश दिला जातो. जि.प.शाळेत येणारा मुलगा अंगणवाडीत गेलेला असेलच अशी खात्री देता येत नाही शिवाय  अंगणवाडी ताईंनाही अहवाल व इतर कामे यातून वेळ मिळेलच असं आपण म्हणू शकत नाही .
                 खासगी शाळेत प्रवेश घेणारे बहुतांश सुशिक्षित वर्गातील असतात त्यामुळे पाल्याच्या प्रगतीबाबत ते दक्ष असतात.भरमसाठ डोनेशन घेतले जाते व नंतर गुणवत्ता दाखवली जाते.अर्थात गुणवत्ता म्हणजे काय असंही विचारले जाऊ शकते पण तो आपल्या लेखाचा विषय नाही.जि.प. शिक्षक मात्र गोरगरिबांची मुले शिकवत असतो आणि त्याबद्दल त्याची तक्रारही नसते कारण तो देखील त्याच स्थितीतून आलेला असतो. यातूनही जेव्हा मुले गुणवत्ता यादीत झळकतात तेव्हा ही या विषम व्यवस्थेला लगावलेली चपराक असते.
               खासगी शाळेत प्रवेश घेण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे इंग्रजीचे आकर्षण.उच्च शिक्षण आजही मातृभाषेत मिळत नाही त्यामुळे पुढे मुलापुढे अडचणी निर्माण होतील हा विचार पालक करतात.जि.प. शाळेत इंग्रजी विषय असला तरी काही अपवाद सोडले इंग्रजीची अवस्था दयनीय आहे.यासंदर्भात शिक्षकांना कोणत्या व कशाप्रकारचे प्रशिक्षण हवे यासंदर्भात त्यांची मते विचारात घ्यायला हवीत.
               पर्यवेक्षीय यंत्रणेने सातत्याने शाळेला भेटी देऊन शिक्षकांना प्रोत्साहित करायला हवे.दरवर्षी १ शाळा दत्तक घेऊन त्यात सुधारणा करायला हवी.शिक्षकांमध्ये प्रेरणेचा अभाव आहे.पाठीवर नुसती थाप मारली तरी गुणवत्ता कशाशी खातात हे दाखवून देतील पण दुर्दैवाने असे होत नाही.
                आणखी महत्त्वाचं कारण अशैक्षणिक कामांचा होत असलेला मारा.अहवालांना दिले गेलेले अवास्तव महत्व. यात शिक्षकाचा कारकून कधी होतो हे त्याचे त्यालाच कळत नाही.तरीही या सगळ्यावर मात करीत तो आपले काम प्रामाणिकपणे करत असतो पण जेव्हा चुकीच्या धोरणांचा बळी त्याला देण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा काही क्षण तो निराश होतो व पुन्हा सगळे विसरून नव्याने कामाला सुरुवात करतो.
                 घटत्या पटसंख्येसाठी शिक्षकांना जबाबदार धरले जाते म्हणूनच या लेखाद्वारे वस्तुस्थिती मांडण्याचा हा प्रयत्न...धन्यवाद

           ........सुनिल पवार

सोमवार, २२ जून, २०१५

एकाग्रता

           माझी स्मरणशक्ती खूपच कमी आहे.मला थोड्या वेळापूर्वी ठेवलेली वस्तूदेखील सापडत  नाही, माझे मन एकाग्र होत नाही असे संवाद आपण  ऐकत असतो. पण असं काही नसतं.एक शिक्षक म्हणून काम करीत असताना आपल्याला अनुभव येतो की, मुलांची गाणी पाठ होत असतात. ज्यावेळेस अभ्यासाची वेळ येते तेव्हा मात्र मुलांचे लक्ष लागत नाही.पाठातील आशय त्यांना कंटाळवाणा वाटू लागतो.
           हे का घडते याचे कारण शोधायचा प्रयत्न करताना असे लक्षात येते की, एखादे काम करताना आपण जर दुसराच विचार करत असू तर नक्कीच विस्मरण,काम व्यवस्थित न होणे या गोष्टी घडतात. जी गोष्ट आपल्याला आवडत असते ती गोष्ट आपल्या लक्षात राहते, याउलट ज्यात आपल्याला रस नसतो अशी बाब स्मरणात राहत नाही.म्हणजे स्मरणशक्ती कमी असण्याचा मुद्दाच राहत नाही. अर्थातच एकाग्रता वाढवायची असेल तर जी गोष्ट करणार आहोत ती आवडीने करायला हवी. कोणतीही कृती करताना आपले लक्ष त्या कृतीवरच हवे.अर्जुनाने मला फक्त पक्ष्याचा डोळा दिसतो असे सांगितले व तोच लक्ष्यभेद करू शकला.आपण एकाच वेळेस मेंदूला अनेक गोष्टी करायला सांगत असू  तर एकही गोष्ट व्यवस्थित होत नाही.हे लक्षात घ्यायला हवे.
           आता हे सर्व ठीक आहे की,एकावेळेस एकच गोष्ट करायला हवी पण मन तर चंचल आहे त्याला ही सवय कशी लावायची हा मोठा प्रश्न आहे.साध्या साध्या गोष्टींपासून सुरुवात करू. सकाळी आपण दात घासतो.मनात वेगळेच विचार असतात.त्याऐवजी आपले अवधान ब्रशवर हवे.हात-पाय धुण्याचे काम चालू असेल तर त्यांच्याकडे प्रेमाने लक्ष द्यावे.जेवताना प्रत्येक घास घेताना त्याप्रती जागरुकता हवी.अशा छोट्या छोट्या गोष्टींनी हळूहळू एकाग्रता वाढू लागेल.मन हे जरी चंचल असले तरी एका क्षणाला एकाच गोष्टीचा विचार करू शकते हे लक्षात घ्यायला हवे.
            न्यूटनने अनेक शोध लावले.तो आपल्या कामात इतका मग्न होत असे की त्याला इतर गोष्टींचे भान राहत नसे.त्याबद्दलचे अनेक विनोद आपण वाचले आहेत पण त्याच्या एकाग्रतेमुळेच विज्ञानातील त्याचे योगदान अतुलनीय आहे.सचिन तेंडुलकरचा क्रिकेट हाच श्वास होता.परिणाम आपल्यासमोर आहे. आईचे आपल्या मुलावर प्रेम असते त्या प्रेमामुळेच ती त्याच्यासोबत तासनतास रमते.ही एकाग्रता नाही तर दुसरे काय  आहे?
            दैनंदिन जीवनातील काम असो अथवा गाठावयाचे ध्येय असो त्यात रुची घेऊन ते काम करायला हवे.अभ्यासात एखादा विषय आवडत  नसेल तर त्यात रुची कशी आणावी हा वैयक्तिक कौशल्यावर अवलंबून आहे.विषय मनोरंजक पद्धतीने कशाप्रकारे हाताळावा याबद्दल चर्चा पुढील लेखात करू.आपलेही अनुभव सांगा म्हणजे फलनिष्पत्ती सहज होईल.
                                                           ........सुनिल पवार

रविवार, २१ जून, २०१५

सावित्री



सावित्री,कशाला केलास अट्टाहास,
तू स्त्रियांना शिकवण्याचा
हालअ‍पेष्टा सहन करीत 
समाजाला बदलण्याचा

आम्ही नाही बदललो 
आम्ही नाही बदलणार  
मुलगी जन्माला येते म्हणून 
तिला गर्भातच संपवणार

एखादी आली जन्माला 
तरी तिचे भविष्य कसे घडणार
वासनेने बरबटलेलो आम्ही
तिची कोवळ्या वयातच शिकार करणार 

झालीच मोठी ती  तरी
प्रश्न नाही सुटणार
लग्नाचा बाजार मांडून
आम्ही तिला छ्ळणार

असेल रुपवान,गुणवान
त्याने फरक काय पडणार
हुंडा मिळाला नाही तर
तिला जाळून मारणार

काय म्हणालीस सावित्री, 
आता गप्प नाही  बसणार
झाशीच्या राणीसारखी
रणरागिणी होऊन लढणार

खूप उशीर केलास  
पण योग्य निर्णय लढण्याचा
झुगारुन टाक बंधने सारी
सोड  आधार पुरुषी कुबड्यांचा